इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगली: सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसर आज पहाटे भूकंपाच्या धक्क्याने हादरला. पहाटे चार वाजून ४७ मिनिटांनी चांदोली धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता तीन रिश्टर स्केल आहे.
शिराळा तालुक्यातील वारणावती परिसरात सुमारे आठ किलोमीटर परिसरात भूकंपाचे हादरे जाणवले. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना भूकंप झाला. गेल्या काही दिवसांपासून सांगलीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच भूकंपाचे हादरे जाणवले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र हा भूकंप सौम्य असल्यामुळे चांदोली धरणास कोणताही धोका नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.