नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई केलेली असतांना पूर्व परवानगी न घेता राजरोसपणे शहरात वावरणा-या दोघा तडिपारांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. वेगवेगळया भागात दोघे मिळून आले असून याप्रकरणी अंबड व उपनगर पोलीस ठाण्यात हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लक्ष्मण उर्फ लक्ष्या राजेंद्र कोळी (२४ रा.संविधान चौकाजवळ,चुंचाळे) व मयुर अनिल जानराव (२१ रा. शेलार मळा,जेलरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तडिपारांची नावे आहेत. वेगवेगळया भागात राहणारे कोळी व जानराव यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलीसांनी त्यांच्या विरोधात दोन वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिह्यातून दोघांना तडिपार करण्यात आलेले असतांना त्यांचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.२२) दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. कोळी दत्तनगर येथील घरकुलरोडवरील रौंदळ बार भागात तर जानराव भिमनगर येथी धर्मनाथ सोसायटीच्या समोरील सम्राट गार्डनच्या भिंतीलगत मिळून आला. ही कारवाई एमआयडीसी पोलीस चौकी आणि शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली. याप्रकरणी एमआयडीसीचे अंमलदार अर्जुन कांदळकर व युनिट दोन चे कर्मचारी प्रकाश भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सावळे व उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.