नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खरीपाचा कांदा बाजारात येण्यास उशीर होत असल्या कारणाने बाजारात गेल्या काही काळात कांद्याच्या दरात होत असलेल्या वाढीपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने राखीव साठ्यातील कांद्याची २५ रुपये किलो या अनुदानित दराने किरकोळ विक्री करण्यास धडाक्याने सुरुवात केली आहे. देशांतर्गत ग्राहकांसाठी कांद्याची उपलब्धता आणि किफायतशीरपणा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सरकारने २९ ऑक्टोबर २०२३ पासून कांद्याचे किमान निर्यात मूल्य ८०० अमेरिकी डॉलर्स प्रती मेट्रिक टन ठेवणे, राखीव साठ्यामध्ये २ लाख टन कांद्याची भर, ५.०६ लाख टन कांद्याची याआधीच केलेली खरेदी आणि किरकोळ विक्री, ई-नाम लिलाव तसेच ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून घाऊक बाजारात सुरु केलेली मोठ्या प्रमाणातील विक्री असे उपक्रम याआधीच राबवण्यास सुरुवात केली आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने एनसीसीएफ तर्फे संचालित किरकोळ विक्री दुकाने आणि मोबाईल व्हॅन, नाफेड, केंद्रीय भांडार आणि इतर राज्य नियंत्रित सहकारी संस्थांच्या माध्यमातून २५ रुपये किलो दराने कांद्याची जोरदार विक्री सुरु केली आहे. नाफेडने २ नोव्हेंबर पर्यंत देशाच्या २१ राज्यांतील ५५ शहरांमध्ये दुकाने आणि मोबाईल व्हॅन यांचा समावेश असलेली ३२९ किरकोळ विक्री केंद्रे उभारली आहे. त्याचप्रमाणे, एनसीसीएफने २० राज्यांतील ५४ शहरांमध्ये ४५७ किरकोळ विक्री केंद्रे स्थापन केली आहेत. त्याच धर्तीवर, केंद्रीय भांडारतर्फे देखील ३ नोव्हेंबर २०२३ पासून त्यांच्या किरकोळ विक्री केंद्रांमध्ये कांद्याची किरकोळ विक्री सुरु केली आहे तर सफल मदर डेरी देखील या आठवड्याच्या शेवटी कांदा विक्रीला सुरुवात करणार आहे.
रबी आणि खरीप पिकांच्या दरम्यान कांद्याच्या दरातील हंगामी चढउतारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नंतर योग्य वेळी आणि लक्ष्यित पद्धतीने कांदा विक्रीसाठी काढता यावा म्हणून केंद्रसरकार रबी कांद्याची खरेदी करून त्याचा राखीव साठा ठेवत असते. या वर्षी कांद्याचा राखीव साठा ७ लाख मेट्रिक टन पर्यंत वाढवण्यात आला. वर्ष 2022-23 मध्ये हा साठा केवळ अडीच लाख मेट्रिक टन इतका होता. आतापर्यंत 5.06 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली असून २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीची प्रक्रिया सुरु आहे.
सरकारच्या सक्रिय उपाययोजनांचा परिणाम आता दिसू लागला असून २८ ऑक्टोबर २०२३ रोजी लासलगाव बाजारात ४,८०० रुपये क्विंटल पर्यंत पोहोचलेला कांद्याचा भाव आता २४ टक्क्याच्या घसरणीसह ३,६५० रुपये क्विंटल झाला आहे. येत्या आठवड्यामध्ये कांद्याचे किरकोळ बाजारातले दरही खाली येतील अशी अपेक्षा आहे.
बहुतांश भारतीय घरांमध्ये डाळी हा पोषणाचा महत्त्वाचा स्त्रोत मानला जातो. सर्वसामान्यांसाठी किफायतशीरडाळींची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने एक किलोच्या पॅकसाठी ६० रुपये प्रतिकिलो तर ३० किलोच्या पॅकसाठी ५५ रुपये किलो असे अनुदानित दर असलेल्या भारत डाळ या उपक्रमाची सुरुवात केली. नाफेड, एनसीसीएफ, केंद्रीय भांडार, सफल आणि तेलंगणा तसेच महाराष्ट्र या राज्यांतील राज्य सरकार नियंत्रित सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामान्य नागरिक, लष्कर, सीएपीएफ आणि कल्याणकारी योजनांसाठी भारत डाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये भारत डाळीचा पुरवठा वाढवण्यात येणार असून त्यामुळे संपूर्ण देशातील ग्राहकांसाठी ४ लाख टनांहून अधिक भारत डाळ उपलब्ध होणार आहे.