इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः भारताचे संरक्षण उत्पादन क्षेत्र सतत वाढत आहे. संरक्षण सामग्रीच्या निर्यातीत वर्षानुवर्षे वाढ होत असल्याने भारताच्या आर्थिक प्रगतीलाही हातभार लागला आहे. भारताने २०२३-२४ या वर्षात आपल्या संरक्षण निर्यातीत पूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले. भारताने या वर्षी सुमारे २.५ अब्ज डॉलरच्या संरक्षण सामग्रीची निर्यात केली आहे.
आता जगालाही भारताच्या शस्त्रास्त्रांच्या दर्जावर विश्वास बसला आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार, भारतातील सुमारे शंभर खासगी कंपन्या त्यांच्या संरक्षण वस्तूंची जगभरात निर्यात करत आहेत. यामध्ये ड्रोनएअर-२२८ विमान, आर्टिलरी गन, ब्राम्होस सुपर सॉनिक मिसाइल, क्रूझ मिसाईल, पिनाका मल्टी रॉकेट लाँचर सिस्टम, रडार, सिम्युलेटर आणि सशस्त्र वाहनांचा समावेश आहे. भारताच्या संरक्षण निर्यातीत सातत्याने वाढ होत आहे. भारताची संरक्षण निर्यात २०२२ मध्ये सुमारे १.७ अब्ज डॉलरहोती, तर २०२३ मध्ये ती सुमारे दोन अब्ज डॉलर होती. या वर्षी ती सुमारे अडीच अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे आणि हा आकडा गाठल्यानंतर, भारत आता जगातील २५ देशांपैकी एक बनला आहे, जे सर्वाधिक शस्त्रे निर्यात करतात.
भारत सरकारने या क्षेत्रातील निर्यात वाढवण्यासाठी विविध प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात सातत्याने वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने अद्याप खरेदीदार देशांची नावे सार्वजनिक केलेली नाहीत; परंतु आर्मेनिया ही शस्त्रास्त्रांची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे. पिनाका रॉकेट, आकाश हवाई संरक्षण प्रणालीसाठी भारताने आर्मेनियाशी करार केला होता. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारताचे संरक्षण सामग्रीचे उत्पादन या वर्षी १.२६ लाख कोटी रुपयांचे होते, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्के अधिक आहे. भारत आजही जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश आहे. २०१९ ते २०२३दरम्यान, भारताने जगभरात विकल्या गेलेल्या शस्त्रास्त्रांपैकी सुमारे दहा टक्के शस्त्रे खरेदी केली;पण शस्त्र खरेदी करणारा देश आता शस्त्रास्त्रे विकू लागला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे.