इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॅारंट जारी केले आहे. प्रथम न्यायदंडाधिकारी ए.सी. बिराजदार यांनी हे अटक वॅारंट जारी केले आहे. जरांगे यांच्यासह दोन व्यक्तीवर पुण्याच्या कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जरांगे यांना न्यायालयाने दोन वेळा समन्स बजावले होते. मात्र ते न्यायालयात उपस्थितित राहिले नाही. त्यामुळे न्यायालयाने जरांगे यांच्यासह अन्य दोघांविरुध्द अजामीनपात्र अटक वॅारंट काढले आहेत.
या प्रकरणाबाबत मिळालेली माहिती अशी की, जरांगे यांच्यासह अर्जून जाधव आणि दत्ता बहिर यांनी शिवबा संघटनेने २०१३ साली एका नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकाचा प्रयोगा झाल्यानंर त्याचे पैसे दिले नाही. याप्रकरणी न्यायालयामध्ये नाटक कंपनीने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये हे अटक वॅारंट जारी करण्यात आले.