मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी लोकसभेत २०२४-२५चे बजेट सादर केले. सक्षम अंगणवाडी व पोषण २ या हेडवर मागील वर्षीच्या वाढीव बजेटच्या २१५२३ हजार कोटी रुपयांच्या तुलनेत वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर बजेट वाढवण्याऐवजी ३२३ कोटींची कपात करून फक्त २१२०० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
२०१८ पासून गेली ६ वर्षे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झालेली नाही. २०१३ मध्ये आहाराच्या दरात प्रति लाभार्थी दररोज ६ रुपयांवरून ७ रु ९२ पैसे अशी वाढ करण्यात आली आणि २०१७ साली फक्त ८ पैशांची वाढ करून तो दर ८ रुपये करण्यात आला. त्यानंतर आजतागायत गेल्या ७ वर्षात या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे आहाराची गुणवत्ता घसरून कुपोषणात वाढ झाली आहे. या बजेटमध्ये मानधन व आहाराच्या दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारने पुन्हा एकदा अंगणवाडी कर्मचारी व लाभार्थी या दोन्ही घटकांना निराश केले आहे.
केरळमधील त्रिवेंद्रम येथे अ.भा. अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनच्या बैठकीत केंद्र सरकारने केलेल्या या बजेट कपातीची व कर्मचारी व कुपोषित बालकांकडे केलेल्या दुर्लक्षाची तीव्र टीका करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. फेडरेशनने देशभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या लाभार्थी पालकांना सोबत घेऊन या निराशाजनक, जनविरोधी बजेटची होळी करावी असे आवाहन केले आहे. त्यानुसार सध्या राज्यात पुकारलेल्या असहकार आंदोलनाबरोबर संपूर्ण राज्यातील प्रत्येक प्रकल्पात बजेटची होळी करण्याचे आंदोलन करण्यात येईल.
अशी माहिती शुभा शमीम उपाध्यक्ष, अ.भा.अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशन, राज्य अध्यक्षा, अंगणवाडी कर्मचारी संघटना, (महाराष्ट्र) यांनी दिली.