नाशिक (इडिया दर्पण वृत्तसेवा) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा योजना राबविण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहायता बचत गटांनी 31 जुलै, 2024 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहायता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्यात येतो. योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. अध्यक्ष, सचिव व 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रूपये 3 लाख 50 हजार इतकी आहे. स्वयंसहायता बचत गटांनी या कमाल मर्यादेच्या रकमेच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर 90 टक्के शासकीय अनुदान अनुज्ञेय असते. अनुज्ञेय रक्कम 3 लाख 50 हजारापेक्षा अधिकची रक्कम संबंधित बचत गटाला स्वत: खर्च करावी लागेल. स्वयंसहाय्यता बचत गटांनी राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदर बँक खाते बचतगटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न असावे. स्वयंसहाय्यता बचत गटांचे उत्पन्न वाढावे, या हेतुने मिनी ट्रॅक्टर/ ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इतर शेतकऱ्यांना भाडे तत्वावर देता येतील. परंतु कोणत्याही परिस्थितीत त्याला या साधनांची विक्री अथवा सावकार व अन्य व्यक्तींकडे गहाण ठेवता येणार नाही.
योजनेच्या अधिक माहितीसाठी तसेच इतर अटी व शर्तींच्याअधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पूलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.