नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतकऱ्यांना आजच्या अर्थसंकल्पातून संपूर्ण कर्जमुक्तीच्या घोषणेची अपेक्षा होती प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांची निराशा झाल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, सरकारला शेतमाल उत्पादन वाढवायचे आहे परंतु शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला शाश्वत बाजारभाव मिळत नाही ही मुख्य समस्या आहे. आजच्या अर्थसंकल्पातून नैसर्गिक शेती आणि शेतमाल साठवणूक क्षमता वाढवणे याबाबत केलेल्या तरतूदीचे स्वागत. परंतु कांदा निर्यातबंदी करून थेट कांद्याचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. आजच्या अर्थसंकल्पात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणताही धोरणात्मक निर्णय आणि आर्थिक तरतूद झाली नाही.
सरकारने कांद्यावरील किमान निर्यातमूल्य व निर्यात शुल्काच्या माध्यमातून जमा केलेले कोट्यवधी रुपये कांदा उत्पादकांना परतावा म्हणून देण्यासाठी तरतूद करायला हवी होती 1.52 लाख कोटींची कृषी क्षेत्राच्या तरतुदींपैकी कांदा उत्पादकांसाठी कवडीचीही तरतूद केलेली नाही. एकंदरीत शेतकरी कर्जाच्या ओझ्याखालीच दबलेले राहतील असा आजचा अर्थसंकल्प आहे.