इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः राज्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढणार असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना खास निमंत्रण दिले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी ॲड. आंबेडकर यांनी भुजबळ यांना ई-मेलद्वारे निमंत्रण पाठवले आहे. ॲड. आंबेडकर यांनी याची माहिती त्यांच्या एक्स हॅंडलवर पोस्ट करून दिली आहे. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा चैत्यभूमीवरून २५ तारखेला सुरू होणार आहे. याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यातून जाणाऱ्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होणाऱ्यासाठी ओबीसी आंदोलकांसह, महाराष्ट्रातील काही बड्या नेत्यांनाही निमंत्रण देवण्यात येणार आहे.