इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मूग गिळून गप्प बसले आहेत, अशी टीका ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली. ओबीसी जनतेच्या मनात स्वाभिमान व विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे ही या प्रकरणी मूग गिळून गप्प बसले असून आता आरक्षण वाचवण्यासाठी गावगाड्यातील लोकांनीच एकत्र येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरू केले आहे. प्रा. हाके यांनी त्यांच्या उपोषणाला विरोध वडीगोद्री येथून जनआक्रोश यात्रा काढली आहे. त्यांनी आरक्षणाच्या मुद्यावर पवार यांच्यावर टीका केली. राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद पवार यांनी पुढाकार घेऊन सोडवण्याची गरज असताना ते जरांगे यांची भाषा बोलत आहेत. ओबीसी आरक्षणावर पवार यांच्यासह ठाकरे यांनी बोलण्याची गरज आहे, असे प्रा. हाके यांनी म्हटले आहे.