इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नांदेडः काँग्रेसचे दोन आमदार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. नांदेड जिल्हयातील देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्यांशी चर्चा केली.
आ. अंतापूरकर यांनी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत अंतापूरकर यांनी काँग्रेसचा प्रचार केला नाही तसेच राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला परभवाचा सामना करावा लागला. ज्या आमदारांनी पक्षाचा आदेश डावलला, त्यात आ. अंतापूरकर यांच्या नावाचाही समावेश आहे. पक्षाने कारवाईचे संकेत दिल्यानंतर त्यांनी पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे.
अंतापूरकर हे खा. चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर आ. अंतापूरकर यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता वर्तवण्यात येत होती; मात्र पक्षांतरबंदी कायद्यामुळे काही नेत्यांनी भाजप प्रवेश टाळल्याचे सांगितले जात होते. विधान परिषद निवडणुकीत पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आ. अंतापूरकर यांनी खा. चव्हाण यांच्या घेतलेल्या भेटीची चर्चा सुरू आहे. चव्हाण यांच्या पाठोपाठ आ. अंतापूरकर आणि नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार मोहनराव हंबर्डे काँग्रेसचा हात सोडण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात हे दोन आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे.