मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ स्थानिक स्तरावर व एकाच ठिकाणी विविध विभागांच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यासाठी महाराजस्व व महाआरोग्य अभियान तालुक्यात १५ ऑगस्टपूर्वी राबविण्यात येणार आहे. हे दोन्ही अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्वतयारी करुन समन्वयाने नियोजनाद्वारे काम करावे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.
तालुक्यातील काष्टी येथील आनंद आश्रम येथे महाराजस्व व महाआरोग्य शिबीर राबविण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, महानगरपालिका आयुक्त रविंद्र जाधव अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, उप विभागीय अधिकारी नितीन सदगीर, उपविभागीय कृषि अधिकारी गोकुळ आहिरे, तहसिलदार नितीनकुमार देवरे, तालुका कृषि अधिकारी भगवान गोर्डे, भूमिअभिलेख अधिकारी राहुल पाटील, महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी जयश्री आहेर, गट विकास अधिकारी अजितसिंग पवार, मालेगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. लक्ष्मण चव्हाण यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, नागरिकांना शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता तसेच त्यासंबंधी माहिती किंवा मार्गदर्शन मिळविण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यालयात जावे लागते. या अनुषंगाने महाराजस्व उपक्रमाच्या माध्यमातून विविध कामांसाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे, दाखले व योजनांचा लाभ, सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्याअनुषंगाने नागरिकांना या अभियानाच्या माध्यमातून जागेवरच आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन लाभ देण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी दिल्या.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना अधिकाधिक चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी कटिबध्द आहे. त्याअनुषंगाने तालुक्यातील नागरिकांना तालुका व जिल्हास्तरावरील वैद्यकीय सेवा विशेष तज्ज्ञांच्या उपस्थितीत एकाच ठिकाणी मिळण्यासाठी महाआरोग्य अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना वैद्यकीय सुविधेचा प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार असल्याचे त्यानी यावेळी सांगितले.
यावेळी देवदत्त केकाण, डॉ. कपिल आहेर व रविंद्र जाधव यांनी आपआपल्या विभागाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांची सविस्तर माहिती दिली. तसेच इतर विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची व अभियानात नागरिकांना देण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष सेवांची सविस्तर माहिती सादर केली. यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी संबंधित विभागाने प्रलंबित प्रकल्प व प्रकरणांचा तात्काळ निपटारा करावा, आदिवासी बांधव व दिव्यांग बाधवांना देण्यात येणारे विविध दाखले वेळीच वाटप करण्यात यावेत, ऑनलाईन रेशन कार्डची कार्यवाही करण्यात यावी. मालेगाव महानगरपालिकेने प्लॅस्टिक निर्मुलनाची कार्यवाही करावी. सर्व विभागांनी आपल्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ करुन एक पेड माँ के नाम योजनेंतर्गत वृक्ष लागवड करावी. तसेच या अभियानात लाभ देण्यात येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची यादी तात्काळ संबंधित विभागाकडे जमा करावी, अशा सूचना सबंधित विभागाला पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिल्या. यावेळी प्रास्ताविक नितीन सदगीर यांनी केले तर आभार तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी मानले.