नाशिक रोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक रोडच्या सरकारी इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी) आणि करन्सी नोट प्रेस (सीएनपी) मधील प्रेस मजदुर संघाच्या निवडणुकीत पुन्हा कामगार कामगार पॅनलनेच विजय मिळवला आहे. गेल्या बारा वर्षापासून एकहाती सत्ता मिळवलेल्या कामगार पॅनलने रविवारी जाहीर झालेल्या निकालानुसार सर्व २९ जागा जिकंत पुन्हा एकदा सत्ता हस्तगत करून आपला पॅनलला धूळ चारली.
या निवडणुकीत सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर यांच्यासह सर्व पदाधिका-यांनी दणदणीत विजयी मिळवला. कार्यकारिणीच्या सर्व सोळा जागांवरही कामगार पॅनलचेच उमेदवार विजयी झाले. आपला पॅनलचा पराभव झाला. या पॅनलचे नेतृत्व करणारे हरिभाऊ ढिकले, किरण गांगुर्डे, अशोक सुजगुरे आदींनी चांगली लढत दिली.
मजदुर संघाच्या २९ जागांसाठी तर वर्क्स कमिटीच्या २८ जागांसाठी सुमारे ९५ टक्के मतदान झाले. एकूण १८०४ मतदार होते. प्रेस मजदूर संघाच्या निवडणुकीत परंपरेनुसार अध्यक्षांची निवड बिनविरोध केली जाते. त्यानुसार संघाच्या अध्यक्षपदासाठी हिंद मजदूर सभेचे नेते जयवंत भोसले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडणुकीत कामगार पॅनल आणि आपला पॅनल यांच्यात मुख्य लढत झाली. दोन्ही पॅनलने जोरदार प्रचार केला. प्रेस मजदूर संघाची मतमोजणी रविवारी (दि.२१) सकाळी सुरु झाली. ती रात्री उशिरापर्यंत चालली. यासाठी दोन्ही प्रेसमध्ये प्रत्येकी पाच टेबल लावण्यात आले आहे. निवडणुक अधिकारी म्हणून उत्तमराव गांगुर्डे यांनी काम पाहिले. मतमोजणीच्या तिन्ही फे-यांमध्ये कामगार पॅनलने आघाडी घेतली.
कामगार पॅनलचे विजयी उमेदवार. (निवडणूक चिन्ह विमान)
कार्याध्यक्ष- ज्ञानेश्वर जुंद्रे (१०५०मते), सरचिटणीस-जगदीश गोडसे (१०७०).
उपाध्यक्ष (४ जागा) – राजेश टाकेकर (१०२७), रामभाऊ जगताप (९३६), कार्तिक डांगे(९५७), प्रवीण बनसोडे(८५८).
सहसचिव- (६ जागा)- अविनाश देवरूखकर (९९१), बबन सैद (९५९), चंद्रकांत हिंगमिरे (१०४०), संतोष कटाळे (१०२०), राजू जगताप (९६४), निवृत्ती कदम (१००८). खजिनदार- अशोक पेखळे (९६९).
कार्यकारिणीवरच्या सर्व १६ जागांवरही कामगार पॅनेलने विजय मिळवला. हे उमेदवारांचे असे- मनीष कोकाटे, सचिन चिडे, राजेंद्र वारुंगसे, दशरथ बोराडे, समाधान भालेराव, बाळकृष्ण सानप, शंतनु पोटिंदे, संजय गुंजाळ, सतीश चंद्रमोरे, संपत घुगे, रौफ शेख, कांचन खर्जुल, दत्ता गांगुर्डे, विनोद गांगुर्डे, संदीप व्यवहारे, शैलेश जाधव.