नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकरोड येथे उधारीचे पैसे मागितल्याने टोळक्याने ऊसळ विक्रेत्यास मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत धारदार शस्त्राचा वापर करण्यात आल्याने विक्रेता जखमी झाला आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बादशहा महम्मद शेख,(रा.विहीतगाव,बागुलनगर), रिझवान,अजय लोंढे व गणू अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत संदिप नरसिंग शिंदे (२६ रा,.अरिंगळे मळा,एकलहरेरोड) या युवकाने फिर्याद दिली आहे. शिंदे यांचा ऊसळ विक्रीचा व्यवसाय आहे. नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाजवळील चामुंडा कलेक्शन जवळ ही घटना घडली.
शिंदे शनिवारी (दि.२०) नेहमी प्रमाणे आपला व्यवसाय सांभाळत असतांना बादशाह शेख व त्याचा मुलगा रिझवान यांनी त्यांच्याजवळून ऊसळ खरेदी केली. यावेळी शिंदे यांनी घेतलेल्या आणि उधारीचे असे ४० रूपयांची मागणी केल्याने हा वाद झाला. संतप्त बापलेकाने शिवीगाळ करीत शिंदे यांना मारहाण केली. यावेळी रिझवान याने आपल्या दोन साथीदारांना बोलावून घेत धारदार हत्याराचने शिंदे यांच्यावर वार केले. या घटनेत ऊसळ विक्रेता शिंदे जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.