इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः रिलायन्स इंडस्ट्रिजचे मालक, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना खंडणीसाठी धमक्या आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असली, तरी त्यांना धमक्या येण्याचे काही थांबत नाही. त्यांना कोट्यवधी रुपयांच्या खंडण्यांसाठी आणखी दोन मेल आले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अंबानी यांना धमक्या देणाऱ्यांनी सुरुवातीला वीस कोटी, नंतर दोनशे कोटी रुपये मागितले होते. आता चारशे कोटी रुपये मागितले आहेत. त्यांना आतापर्यंत धमकीचे पाच ई-मेल आले आहेत. यापूर्वी तीन ई-मेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली; परंतु धमकी देणारे काही अंबानी यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. आता त्यांना आणखी दोन ई-मेल आले आहेत. हे ई-मेल कुणी पाठविले, याचा शोध लागलेला नाही; परंतु मुंबई पोलिस आता तांत्रिक मदत घेऊन तपास करीत आहेत.
यापूर्वी पाठवलेल्या खंडणीच्या धमक्यांच्या ई-मेलला मुकेश अंबानी यांनी फारसे गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे खंडणीखोरांचे पित्त खवळले आहे. हे धमकीचे ईमेल बेल्जियममधील फेन्स मेल या कंपनीच्या सुविधेचा वापर करून करण्यात येत असल्याची माहिती उघड झाली आहे. अंबानी यांना याच वर्षी खंडणीसाठी जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या नाहीत, तर गेल्या वर्षीही त्यांना अशीच धमकी देण्यात आली होती. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल आला होता. ही धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी दिली होती. डॉ डी बी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती.
ऑगस्ट २०२२ मध्ये मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दहशतवादी अफजल गुरू आहे, असे सांगून मुकेश अंबानी आणि त्यांचे दिवंगत वडील धीरूभाई अंबानी यांच्या नावाने वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती. या आरोपीने रिलायन्स रुग्णालयात नऊ वेळा कॉल करून धमकी दिली. विष्णू बिंदू भूमिक या आरोपीला बोरिवलीमधून ताब्यात घेण्यात आले होते. आता तर परदेशातील कंपनीच्या सेवेचा वापर करून धमकी देण्यात आली आहे.