नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकमध्ये पुन्हा हिट अँड रनची घटना घडली आहे. नाशिक पुणे मार्गावरील पळसे येथील विसावा हॉटेल परिसरात भरधाव कारने दिलेल्या धडकेत ५८ वर्षीय परप्रांतीय पादचारी ठार झाला. या अपघातानंतर कारचालक आपल्या वाहनासह पसार झाला असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद प्रसाद रघुनाथप्रसाद जैन (मुळ रा.हरियाणा हल्ली चौधरी बिल्डरर्स,पळसे ता.जि,नाशिक) असे मृत परप्रांतीयाचे नाव आहे. जैन रविवारी (दि.२१) सकाळी दहाच्या सुमारास पळसे येथील विसावा हॉटेल भागात गायींना नैवेद्य दाखविण्यासाठी गेले होते. नैवेद्य दाखवून ते घराकडे परतत असतांना पुण्याकडून नाशिकच्या दिशेने भरधाव जाणा-या अज्ञात चारचाकी कारने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात गंभीर जखमी झाल्याने सविता गवळी यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अपघातानंतर चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून याबाबत पोलीस नाईक अनिल पवार यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अजित शिंदे करीत आहेत.
…..