पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. शेकडो वर्षानंतर ही महाराज प्रत्येक शिवभक्ताला प्रेरणा देत असतात. अशाच एका अवलियाने आपली १७५ वी हाफ मॅरेथॉन गेल्या शनिवारी विशाळगडावर पूर्ण करून हा अनोखा पराक्रम महाराजांच्या चरणी अर्पण केला. १६६० साली आषाढ पौर्णिमेच्या धुवाधार पावसात मोजक्या मावळ्यांसह महाराजांनी पन्हाळा किल्ल्यातून सिद्धी जोहरचा वेढा मोठ्या कौशल्याने तोडून विशाळ गडावर कूच केले. आज ३६४ वर्षांनी मिलींद बोडके यांनी त्याच मार्गावर आपली १७५ वी मॅरेथॉन पूर्ण करून महाराजांना अनोखी मानवंदना दिली .
रिलायन्स जीओमध्ये कार्यरत असलेले मिलिंद बोडके यांनी या अगोदर देखील आठ वेळा पन्हाळगड ते विशाळगड ही मोहीम पूर्ण केली आहे . त्यांनी याचवर्षी शिवजयंती ला आपली १५० वी अर्ध मॅरेथॉन पुर्ण केली असून दर आठवड्यला एक मॅरेथॉन धावण्याचा त्यांचा शिरस्ता आहे . मिलिंद यांनी आतापर्यंत ५ टाटा मुंबई हाफ मॅरेथॉन, २ टाटा अल्ट्रा हाफ मॅरेथॉन , ६ सातारा हिल मॅरेथॉन, दिल्ली हाफ मॅरेथॉन अशा अनेक प्रतिष्ठित मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत . प्रत्येक वाढदिवसाला जितके वर्ष झाले तेवढे किमी पळून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतात. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी त्यांनी ७५ किमी अंतर १४ तासात पळून पूर्ण केले होते .
मिलिंद बोडके यांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मॅरेथॉन धावताना अभिमानाने हातात तिरंगा आणि त्यांचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो सोबत ठेवतात. त्यांच्या प्रेरणेने अनेकांनी धावायला सुरुवात केली असून नवीन धावणार्यांना ते विनामूल्य प्रशिक्षण देखील देत असतात. धावणे हा सर्वांगसुंदर आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेला व्यायाम प्रकार असल्याचे ते नेहमी सांगत असतात.