इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वॉशिंग्टनः अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी रात्री उशिरा अभूतपूर्व निर्णय घेत अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. गेल्या ५६ वर्षांत असा प्रकार प्रथमच घडला आहे. भारतवंशीय कमला हॅरिस आता अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत.
डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार बायडेन यांनी मतदानाच्या १०६ दिवस आधीच मैदान सोडून उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे केले आहे. डेमोक्रॅट पक्षाच्या प्रबळ दावेदार कमला या अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या भारतवंशीय ठरणार आहेत. दुसरीकडे रिपब्लीकन पक्षानेही डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले, तर भारतवंशीय महिलेला उपाध्यक्षपद देण्याचे जाहीर केले आहे.
हे आहे कारण
२७ जून रोजी बायडेन यांच्या डिबेटमधील पराभवानंतर अमेरिकी राजकारणात उलथापालथ सुरू झाली होती. डेमोक्रॅटिक पक्षातूनच बायडेन यांच्या उमेदवारीला विरोध सुरू झाला होता. त्यामुळे बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.