इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः जो माणूस तुरुंगामध्ये जाऊन आला आहे, ज्याच्यावर हत्येसारखे आरोप होते, अशा माणसाने पवार यांच्यावर आरोप करणे हास्यास्पद आहे. देशाचे गृहमंत्री असलेल्या व्यक्तीने आपण काय होतो याचा विचार करायला हवा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
भाजपच्या महाअधिवेशनात शाह यांनी, ‘महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा भाजपचे सरकार येते, तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळते आणि जेव्हा-जेव्हा शरद पवार यांच्या आघाडीचे सरकार येते, तेव्हा मराठा आरक्षण गायब होते. शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार आहेत, अशी टीका केली होती.
या टीकेला प्रत्युत्तर देताना काकडे म्हणाले, की जेवढे आरोप पवार यांच्यावर केले जातात, तेवढी आमची ताकद वाढते. आम्हाला ऊर्जा मिळते. शाह यांनी केलेल्या आरोपांना आम्ही फार महत्त्व देत नाही. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यापासून ते गल्लीतल्या नेत्यांपर्यंत पवार यांच्यावर टीका करतात, याचा अर्थ पवार ही एक शक्ती आहे. ही शक्ती जोपर्यंत विरोधी पक्षांत आहे, तोपर्यंत विरोधी पक्ष मजबूत राहणार आहे, याची भीती भाजपला वाटत असल्याने ही शक्ती नष्ट करण्यासाठी पवार यांच्यावर खोटे-नाटे आरोप केले जात आहेत.