नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गुन्हेगार व पोलिसांचे संबध नेहमीच चर्चेचा विषय़ असतो. त्यात पोलिसांनी गुन्हेगारांबरोबर कसे वागावे याबाबतही काही पथ्य पोलिसांनी पाळणे गरजेचे असते. पण, पोलिस अधिकारीच गुन्हेगाराबोबर वाढदिवस साजरा करत असेल तर त्याला काय म्हणावे. असाच काहीसा प्रकार वणी येथे घडला व पोलिस उपनिरीक्षकाच्या तो अंगलट आला. वणी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक विजय कोठावळे यांनी पोलिस ठाण्यातच मद्यतस्करीचे गुन्हे दाखल असलेल्या सागर अशोक कापसे (३६, रा. वणी,ता. दिंडोरी) या संशयित आरोपीसोबत स्वतःचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर या अधिका-याची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. हा प्रकार शनिवारी उघडकीस आला.
‘सोशल मीडिया’वर याबाबतचे फोटो व्हायरल होताच पोलिसांनी काही तासांतच संबंधित तस्कराच्या अड्ड्यांवर छापे टाकत १५ हजार ३९० रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून उपनिरीक्षक कोठावळे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली.
मद्यतस्कराने मित्रांसोबत केक आणून थेट कोठावळे यांच्या टेबलवर कापला. पोलिस अधिकाऱ्यांसोबतचे फोटो सार्वजनिक करून जवळीक आहे, हे दाखवून निर्धाकपणे अवैध व्यवसाय सुरू ठेवण्याचा हा प्रकार अधिका-याच्या अंगलट आला.