इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
डेहराडूनः उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ यात्रेच्या मार्गावर दगड पडून तीन भाविकांचा मृत्यू झाला असून त्यात नागपूर आणि जालन्याच्या भाविकांचा समावेश आहे. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. गौरीकुंडपासून तीन किलोमीटर अंतरावर चिरवासा येथे पदपथावरून यात्रेकरू केदारनाथ धामकडे जात असताना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर दगड पडला.
रुद्रप्रयाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नंदन सिंह राजवार यांनी अपघाताची माहिती जेताना सांगितले, की मृतांमध्ये महाराष्ट्रातील नागपूरच्या किशोर अरुण परते, जालना येथील सुनील महादेव काळे आणि रुद्रप्रयाग येथील अनुराग बिष्ट यांचा समावेश आहे. अपघातानंतर राज्य आपत्ती निवारण दलाच्या पथकांनी ढिगाऱ्याखालून आठ जणांची सुटका केली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.