पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका विधानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. कुणीतरी देव बनायला निघाले होते; पण आता त्यावर भाजप आणि संघाचेच लोक बोलत आहेत, शहाण्या माणसांनी याची नोंद घ्यावी, असे ते म्हणाले.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी झारखंडमध्ये माणूस देव होण्याचा प्रयत्न करत असल्याचे विधान केले होते. मानवता नसणाऱ्या लोकांनी आधी माणूस होण्याची गरज आहे. काही लोक सुपरमॅन बनू पाहतात. अलौकिक बनू पाहतात; पण ते तिथेच थांबत नाहीत. त्यांना वाटते आपण देव व्हावे. देव म्हणतात, की आमच्यापेक्षा भगवान मोठे आहेत. मग, तो मनुष्य भगवान बनण्याचा प्रयत्न करतो. आता हे लोक इथेच थांबणार आहेत, की त्यांना त्यापुढे कुठे जायचे आहे? असा सवाल भागवत यांनी केला होता.
भागवत यांच्या या विधानावरून पवार यांनी मोदी यांचे न घेता हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, की भागवत काय म्हणाले याची मला कल्पना नाही. ते कुणाविषयी बोलले हे ही मला माहिती नाही; पण मध्यंतरी कुणीतरी देव बनायला निघाले होते. त्यावर आता त्यांचेच लोक बोलत आहेत. याची नोंद शहाण्या माणसांनी घ्यावी.