इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः अजितदादांचा गुलाबी जॅकेट सध्या चांगलाच चर्चेत आहे. याच जॅकेटच्या प्रश्नांवरुन ते पत्रकारांवर चांगलेच संतापले. अशी फालतू बडबड करायला मी मोकळा नाही. मला गरिबी, विकास याबाबत विचारत जा, असा सल्ला त्यांनी दिला.
अजितदादांना राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि तुम्ही जॅकेटसुद्धा गुलाबी रंगाचे वापरत आहात? याबद्दल एका प्रतिनिधीने प्रश्न विचारल्यावर अजितदादांनी एकेरीत तुला काही त्रास होतो का? अशी उलट विचारणा केली. मला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. मी कोणते कपडे घालायचे, तो माझा अधिकार नाही का? मी माझ्या पैशाने कपडे घालतो. तुमच्या कुणाच्या पैशाने तर नाही ना, असा त्रागा त्यांनी केला. जो सर्वसामान्य माणूस घालतो, त्याच पद्धतीने मीही पेहराव करतो. माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटते ते करतो, असे ते म्हणाले.
शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही गुलाबी जॅकेटवरुन अजितदादावर निशाणा साधला होता. ते म्हणाले की, अजितदादा रोज गुलाबी जॅकेट घालत आहेत. यामागे राज्याचं राजकारण गुलाबी करण्याचा त्यांचा हेतू दिसत आहे. पण तसं होणार नाही, असं सांगतानाच जॅकेट घालून राजकारण होत नसतं, असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला होता. त्यावर अजितदादांनी प्रत्युत्तर दिलं आहे.