नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परराज्यातील बेकायदा दारू वाहतूकीसाठी वाहने पुरवणारा सुरतचा व्यावसायीक पोलीसांच्या जाळ्यात अडकला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहन अपघातामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली असून, मद्यतस्करांपाठोपाठ त्यांना बेकायदा वाहतूकीसाठी वाहने पुरविणा-या व्यावसायीकास ग्रामिण पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्या ताब्यातून महागडी कार जप्त करण्यात आली आहे.
शोहेब अब्दूल गफूर अन्सारी उर्फ सोहेल छत्री (३९ रा.हाजरा मंजिल रामपुरा मसालजी वार्ड सुरत) असे अटक करण्यात आलेल्या वाहनपुरवठा दाराचे नाव आहे. गेल्या रविवारी (दि.७) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कार्पिओ वाहनाचा चांदवड तालूक्यातील हरनुल शिवारात अपघात झाला होता. मद्यतस्करांच्या वाहनाने धडक दिल्याने एक्साईजचे चालक कैलास कसबे यांना प्राण गमवावा लागला. तर एक्साईजच्या एका कर्मचाºयासह लासलगाव पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी या अपघातात जखमी झाले. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेची पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांनी गंभीर दखल घेतल्याने स्थानिक गुन्हे शाखा कामाला लागली असून देवीश पटेल,अश्पाक शेख व राहूल सहाणी या मद्यतस्करांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संशयितांच्या चौकशीत मद्यतस्करीसाठी सुरत येथून वाहने पुरविली जात असल्याच्या माहिती वरून ही कारवाई करण्यात आली.
गुजरात राज्यात तळ ठोकून असलेल्या पथकांनी सुरत शहरात सोहेल छत्री याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या ताब्यातून गुह्यात वापरलेली जीजे २० एक्यू ४३६७ ही टाटा हॅरिअर कार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई अधिक्षक विक्रम देशमाने व अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे, उपनिरीक्षक दत्ता कांभीरे,नाना शिरोळे हवालदार गणेश वराडे,मुकेस महिरे,धनंजय शिलावट,दीपक गुंजाळ,पोलीस नाईक संदिप झाल्टे,प्रकाश कासार,रमेश चव्हाण,नितीन डावखर,मेघराज जाधव तसेच तांत्रीक विश्लेषण विभागाचे पोलीस नाईक प्रदिप बहिरम,हेमंत गिलबिले व भाऊसाहेब टिळे आदींच्या पथकाने केली.