नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूर शहर आणि जिल्ह्यात आज २० जुलै रोजी सकाळी मुसळधार पावसामुळे वाहतूक व जनजीवन विस्कळित झाले. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने सखल भागातील तुंबलेल्या पाण्याचा निचरा झाल्याने जनजीवन व वाहतूक पूर्वपदावर आली. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा जोर लक्षात घेता तत्काळ विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी व जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आढावा घेतला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळेतील मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आज सकाळी साधारणतः सहा वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर हे स्वत: विविध सखल भागात जाऊन परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. महानगरपालिका तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मदतीने आवश्यक त्या ठिकाणी अडचणीत असलेल्या नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्यात आली. पावसामुळे सकाळी विस्कळीत झालेली वाहतूक दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्वपदावर आली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शहरातील अनेक भागांना भेटी देऊन पाहणी केली.
नागपूर ग्रामीण भागात पावसाचे पाणी वस्तीमध्ये घुसल्याने अनेक ठिकाणी लोक अडकून पडले होते. कामठी तालुक्यामध्ये खेडी येथे 15 व्यक्ती, पावनगाव येथे 12 व्यक्ती, महलगाव येथे 10 व्यक्ती हे त्यांच्या राहत्या घराच्या परिसराला पाण्याने वेढा पडल्यामुळे अडकले होते. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. हिंगणा तालुक्यात वाघधरा येथे 5 व्यक्ती वेणा नदीच्या पुरात अडकली होती. एसडीआरएफ मार्फत या व्यक्तींना सुखरुप स्थळी हलविण्यात आले. कुही तालुक्यात 21 घरांची, भिवापूरमध्ये 16 घरांची तर मौदामध्ये 10 घरांची पडझड झाली. याठिकाणी महसूल विभागाची टीम प्रत्यक्ष स्थळावर जाऊन आली असून पंचनामे व इतर प्रक्रिया पूर्ण करीत आहे.