नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रभातनगर व केतकीनगर भागात गुरूवारी (दि.१९) भरदिवसा झालेल्या तीन घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४ लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे व लॅपटॉपचा समावेश आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शैला किरण निकम (रा.महिंद्रा रेसि. प्रभातनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. निकम कुटुंबिय गुरूवारी दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली १५ हजाराची रोकड,व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ९० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याच दरम्यान चोरट्यांनी शेजारी राहणा-या मयुर पुंडलीक उगले यांचेही घरफोडले.
या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ३० हजार रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. यापाठोपाठ याच परिसरातील केतकीनगर येथील सविता सुरेशचंद्र बाविस्कर यांचेही चोरट्यांनी घर फोडले. बाविस्कर यांच्या घरातील रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७६ हजाराच्या ऐवजावर चोरट्यानी डल्ला मारला असून याबाबत पोलीस दप्तरी एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.