नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पूर्णपणे पक्ष्यांसाठी समर्पित असा ‘बर्ड पार्क’ आणि सर्वसामान्य नागरिकांना शुद्ध हवा देणारा ॲाक्सिजन पार्क अशी अनोखी भेट पुढील महिन्यात नागपूरकरांना देणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केली.
ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थ पर्यटनासाठी आज आणखी एक इलेक्ट्रिक बस दाखल झाली असून त्याचे उद्घाटन ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ना. श्री. गडकरी यांनी ‘ॲाक्सिजन पार्क’ची माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जामठा परिसरातून जाणाऱ्या आऊटर रिंगरोडवर हा ॲाक्सिजन पार्क निर्माण केला आहे. गडकरी यांच्या संकल्पनेतून हा पार्क साकारण्यात आला आहे. त्यामुळे दिव्यांग पार्कनंतर आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण नागपूरकरांसह पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार आहे. या पार्कमध्ये एक कॅफे, सायकल ट्रॅक, फक्त पक्ष्यांसाठी असलेली फळझाडे आदींचा समावेश असेल. येथील फळांवर फक्त पक्ष्यांचा अधिकार असेल, असेही ना. श्री. गडकरी यांनी सांगितले. तत्पूर्वी, जायका मोटर्सचे मुख्य संचालक कुमार काळे यांनी ना. श्री. गडकरी यांना वातानुकुलित इलेक्ट्रिक बसची चावी दिली. त्यानंतर फित कापून गडकरी यांनी ही बस ज्येष्ठांच्या सेवेत दाखल केली. यावेळी टाटा मोटर्सचे महाव्यवस्थापक आनंद खरवडीकर, उपमहाव्यवस्थापक सुधीर भाले, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजू मिश्रा, डॉ. संजय उगेमुगे, मोहन पांडे यांची उपस्थिती होती. तसेच टाटा मोटर्सचे पुण्याहून आलेले अधिकारी सर्वश्री अनिकेत वैद्य, अमोल तळेकर, आनंद आगाशे, गणेश चौधरी यांचीही यावेळी उपस्थिती होती.
नागपूर ते माहूर धावणार इलेक्ट्रिक बस
ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानतर्फे ही बस ज्येष्ठांना धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या सहलीसाठी देण्यात येईल. नागपूर ते माहुर असा प्रवास ही बस करेल. विशेष म्हणजे ही बस निःशुल्क तत्वावर चालविण्यात येणार आहे. एका चार्जिंगमध्ये अडीशे किलोमीटरचा प्रवास करण्याची बसची क्षमता आहे.
२६ हजार ज्येष्ठांना लाभ
ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानला तीन गडकरींच्या सौजन्याने यापूर्वी एक ॲालेक्ट्रा कंपनीची आणि अशोक ले-लँड कंपनीची एक डबल डेकर बस मिळाली आहे. या दोन्ही बसच्या माध्यमातून आतापर्यंत २६ हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी शेगाव, आदासा, रामटेकसह विदर्भातील अनेक धार्मिक भागांचे पर्यटन केले आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. विशेष म्हणजे प्रतिष्ठानच्या वतीने ही सेवा निःशुल्क देण्यात येते.