नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून वेगवेगळया भागात राहणा-या दोन मुली नुकत्याच गायब झाल्या आहेत. दोन्ही मुलीचे कुणी तरी अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून याप्रकरणी आडगाव व गंगापूर पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.
आडगाव पोलीस ठाणे हद्दीत राहणारी मुलगी गुरूवारी आपल्या घरात असतांना तिला कुणी तरी पळवून नेले. सदर युवतीचे अपहरण करण्यात आल्याचा अंदाज पालकांनी वर्तविला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत. दुसरी घटना भोसला मिलीटरी स्कूल परिसरात घडली. कॉलेजला गेलेली अल्पवयीन युवती गुरूवारी बेपत्ता झाली असून तिला कुणी तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सोळसे करीत आहेत.