इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः धारावीची ‘अदानी सिटी’ होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला. अदानींकडून होत नसेल तर त्यांनी काम सोडून द्यावे. राज्य सरकारने पुन्हा टेंडर काढावे, अशी मागणी त्यांनी केली. मुंबईभर टीडीआर वापरण्यासाठी अदानींना मोकळीक दिली, असा आरोप ठाकरे यांनी केला आहे.
धारावी विकास प्रकल्पावरून ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि अदानी उद्योग समूहावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने धारावी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मार्चा काढण्यात आला होता. आता पुन्हा एकदा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. आमचे सरकार आल्यानंतर गरज पडली, तर नव्याने धारावी पुनर्विकासाची निविदा काढू, असे ते म्हणाले.
आम्ही धारावीची ‘स्मार्ट सिटी’ करू शकतो. आमचे सरकार आल्यानंतर धारावीतच हक्काचे घर देवू, असे आश्वासन देऊन प्रकल्प पूर्ण होईपर्यंत रोजी, रोटीची सोय अदानी करणार का, असा प्रश्न ठाकरे यांनी विचारला. धारावीकरांना त्यांच्या जागीच हक्काचे घर मिळण्याची मागणी करून ते म्हणाले, की धारावीमध्ये अनेक छोटे-मोठे घरगुती उद्योग आहेत. धारावीचा प्रकल्प होईपर्यंत त्यांच्या उद्योगांचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रकल्प काम पूर्ण होईपर्यंत त्यांच्या उद्योगाची व्यवस्था अदानी करणार आहेत का, असा सवाल केला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारच्या घोषणा या फसव्या असल्याचा आरोप करून ठाकरे यांनी या माध्यमातून लाडकी बहिण योजना आणि लाडका भाऊ योजनेवर त्यांनी निशाणा साधला. लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका मित्र आणि लाडका सूटबूटवाला अशा सरकारच्या योजना आहे का, असा सवाल त्यांनी केला.