नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिह्यातील द्राक्ष आणि कांदा विदेशात निर्यात करणे दोघा व्यापा-यांच्या चांगलेच अंगलट आले असून, खरेदीदारांना माल पुरवूनही त्यांनी पैसे न दिल्याने दोघे व्यापारी अडचणीत सापडले आहे. वेगवेगळया या घटनांमध्ये भामट्यांनी सुमारे ४० लाखांना व्यापा-यांना गंडविण्यात आले आहे. याप्रकरणी मुंबईनाका व इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय ओंकार मिश्रा (रा.गोविंदनगर) या कांदा व्यापा-याने फिर्याद दिली आहे. मिश्रा यांनी सन.२०११ मध्ये प्रतवारी प्रमाणे बांधणी करून स्वखर्चाने समुदेरा शिपींग लाईन लि. या कंपनीच्या मार्फत १७ लाख ३४ हजार रूपये किमतीच्या ६० टन कांद्याची मलेशिया येथे निर्यात केली होती. यापोटी संशयित युगंधर पोलादकर व नितीन जिवारक यांनी मिश्रा यांच्या एस.एम. ट्रेड लिंकच्या खात्यावर दोन लाख रूपये पाठविले होते. मात्र त्यानंतर उर्वरीत रक्कम पाठविण्यास दिरंगाई झाल्याने मिश्रा यांनी संशयितांशी संपर्क साधला असता त्यानी पैसे देण्यास टाळाटाळ करून फसवणुक केली. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात दोघा ठकबाजाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक दत्तात्रेय गोडे करीत आहेत. दुसरी फसवणुक द्राक्ष व्यापा-याची झाली. याप्रकरणी योगेश रमन गो-हे (रा.श्रीराम कॉलनी,इंदिरानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
गो-हे द्राक्ष व्यापारी असून त्यांनी सन. २०२३ मध्ये मिडवाला स्टार फ्रुट स्टॉक ट्रेंडिग कंपनीच्या माध्यमातून दुबई येथे चार कंटेनर द्राक्ष विक्रीसाठी पाठविले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या द्राक्षांना ५४८६२ युएस डॉलर भाव मिळाला होता. याबाबत ट्रेंडिग कंपनीचे मालक गंगाराम सुखदेव चव्हाण (रा.भांडूप,मुंबई) यांनी संपर्क करून आठ दिवसात पैसे पाठवत असल्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर दोन कंटेनर मालाचे पैसे पाठविले. मात्र उर्वरीत २१ लाख ९६ हजार ५०६ रूपयांची परतफेड करण्यास टाळाटाळ झाल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी गगाराम चव्हाण, बापू निंबोरे (रा.श्रीगोंदा अ.नगर) व नितीन नरेश तानिर (रा.बोरीवली,मुंबई) या तीन जणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.