इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने डाव टाकला आहे. सरकारचे दीड हजार रुपये आयुष्यभर पुरणार आहेत का, असा सवाल मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला. आता ते लाडका भाऊ, लाडकी मेहुणी व मेहुणा आदी नव्या योजनाही आणतील, अशी टीका त्यांनी केली.
जरांगे यांनी आजपासून जालन्याच्या आंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली. सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाला पुन्हा एकदा धोका दिल्याचा आरोप केला. सरकारने धोका दिल्यामुळे पुन्हा एकदा उपोषण करण्याची वेळ आली. आता मी मागे हटणार नाही, असे सांगून ते म्हणाले, की मराठा समाजाच्या तरुणांना नोकरभरती, प्रवेश प्रक्रिया आदी अनेक बाबतीत अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारने ‘ईडब्ल्यूएस’, ‘ईबीसी’ व कुणबी हे तिन्ही प्रमाणपत्र सुरू ठेवावे.
सरकारची मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याची इच्छा नाही, असे सांगून ते म्हणाले, की सर्व जातींना अशा योजना जाहीर करून तुम्ही आरक्षणाचा मुद्दा दुर्लक्षित करू शकत नाही. सरकारने मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा केली आहे; पण अद्याप हे शिक्षण मिळत नाही. मुलींना मोफत शिक्षणात भेदभाव करू नका. शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील नुसतेच मोफत शिक्षण दिल्याचा गवगवा करत आहेत.