नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विमा काढून देण्याची बतावणी करीत बंटी बबलीने एका शेतक-याच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतक-याच्या अज्ञान पणाचा लाभ उठवित भामट्यांनी बँक खात्यातील सुमारे साडे सहा लाखाची रक्कम अन्य खात्यात वर्ग करून अपहार केला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळू सखाराम कडाळे (५५ रा.आळंदी कॅनल जवळ म्हसरूळ शिवार) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कडाळे गुरूवारी (दि.१८) आपल्या शेतातील घरी असतांना अज्ञात एका तरूणासह युवतीने त्यांच्या घरी जावून पिक विमा काढून देण्याचे आमिष दाखविले. यावेळी भामट्यांनी कडाळे यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड व महत्वाचे कागदपत्र घेवून फॉर्म भरून घेतल्याने कडाळे यांचा विश्वास बसला. यानंतर बँकेत जावून काही कागदपत्रावर साक्षºया करावयाच्या असल्याचे सांगून भामट्यांनी ही फसवणुक केली.
कडाळे यांना बँक ऑफ इंडियाच्या म्हसरूळ शाखेत सोबत घेवून जात भामट्यांनी त्यांच्या खात्यातील रक्कम अन्य खात्यात वर्ग करीत असलेल्या फार्मवर साक्षºया करून घेत सुमारे ६ लाख ५० हजाराची रक्कम आयसीआयसीआय बँकेच्या एका खात्यात ऑनलाईन वर्ग करून घेतली. ही बाब घरी गेल्यानंतर मोबाईलवर संदेश प्राप्त झाल्याने समोर आली असून कडाळे यांनी तात्काळ पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार करीत आहेत.