नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -येवल्याच्या भागवत बंधूचे चार कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करणा-या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी गजाआड केले आहे. शहर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने संशयिताच्या पुण्यात त्यांना जेरबंद केले आहे. राकेश अंबालाल सोनार (३१ रा.पाटील पार्क चुंचाळे शिवार) असे अटक करण्यात आलेल्या खंडणीखोराचे नाव आहे. गेल्या २८ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती.
रूपचंद भागवत व विष्णू भागवत हे दोघे भाऊ न्यायालयीन कामकाजासाठी शहरात आले होते. सायंकाळच्या सुमारास जिल्हा न्यायालयातील कामकाज आटोपून ते वर्दळीच्या सिबीएस बसस्थानकात पार्क केलेल्या आपल्या वाहनात बसत असतांना ही घटना घडली होती. एक्सयुव्ही वाहनातून आलेल्या संशयितासह पाच जणांनी चार कोटीं दहा लाख रूपयांच्या खंडणीसाठी भागवत बंधूचे अपहरण केले होते. त्र्यंबकेश्वर, वाडीव-हे तसेच मुबई आग्रा महामार्गाने फिरवीत अपहरणकर्त्यांनी रूपचंद भागवत यांना खंडणी न दिल्यास भावास जीवे मारण्याची धमकी देत खंडणीच्या रकमेतील २ कोटी दहा लाख रूपयांची तात्काळ व्यवस्था करण्यासाठी निर्जन स्थळी सोडून दिले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदिप कर्णीक यांनी अपहरणकर्त्याना तात्काळ जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू असतांना गुंडा विरोधी पथकाचे अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांना गुरूवारी (दि.१८) मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. घटनेपासून फरार असलेला सराईत राकेश सोनार मध्यप्रदेश व मुंबई पुण्यात अस्तित्व लपवून वावरत असून त्याने पुण्यात जुनी वाहने खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याची माहिती पोलीसांना मिळाली.
पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धाव घेत पिंपरी चिंचवडसह पुणे परिसर पायदळी तुडवले. वाहन खरेदी विक्री करणा-या व्यावसायीकांसह गॅरेजवर काम करणा-याच्या माहितीत संशयित सोनार हिंजवडीतील सुसगाव भागात भाडेतत्वावर वास्तव्यास असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. तांत्रीक व मानवी कौशल्य वापरून सुसगाव येथील भगवती नगर परिसरातील एका बंगल्यात बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई अंमलदार विजय सुर्यवंशी,डी.के.पवार,प्रदिप ठाकरे,गणेश भागवत,अक्षय गांगुर्डे, प्रविण चव्हाण,मलंग गुंजाळ,राजेश सावकार,सुनिल आडके,निवृत्ती माळी,सुवर्णा गायकवाड व मनिषा कांबळे आदींच्या पथकाने केली.