नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुकान फोडून महागडे मोबाईल लांबविणारे दोघे भामट्यांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयितांच्या ताब्यातून सुमारे ५२ हजार रूपये किमतीचे १८ मोबाईल हस्तगत करण्यात आले असून त्यांच्या अटकेने अजून काही घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. ही कारवाई भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.
सोहेल उर्फ बाबू पप्पू अन्सारी (३२ रा.भारतनगर,वडाळागाव) व वाजीद जैद शेख (१९ रा. पाण्याच्या टाकी मागे,नानावली) ्अशी अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्यांची नावे आहेत. भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील दुकान फोडून चोरट्यांनी महागडे मोबाईल लांबविले होते. ही घटना गेल्या बुधवारी (दि.३) घडली होती. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस चोरट्यांच्या मागावर असतांनाच गुन्हे शोध पथकाचे जमादार यशवंत गांगुर्डे व अंमलदार दयानंद सोनवणे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अंबड औद्योगीक वसाहतीत चोरटे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा लावला असता सोहेल उर्फ बाबू अन्सारी पोलीसांच्या जाळय़ात अडकला होता. तर त्याचा साथीदार वाजीद शेख पोलीसांच्या हातावर तुरी देवून पसार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच मंगळवारी (दि.१६) तो मुंबईनाका परिसरातील मानवता क्युरी हॉस्पिटल भागात मिळून आला.
दोन्ही संशयितांनी दुकान फोडल्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ५२ हजार रूपये किमतीचे १८ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वसंत पवार करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, निरीक्षक संतोष नरूटे व विक्रम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक वसंत पवार,जमादार यशवंत गांगुर्डे, हवालदार सतिष साळुंके,कय्युम सय्यद पोलीस नाईक अविनाश जुंद्रे,अंमलदार दयानंद सोनवणे,निलेश विखे व नारायण गवळी आदींच्या पथकाने केली.