सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सोलापूर जिल्ह्यात एसटी चालकाला फिट आल्यामुळे एसटी पलटी झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. टेंभुर्णी- कुर्डूवाडी महामार्गावर एसटी चालवत असतानाच चालकाला त्याचा तोल गेला. त्यामुळे एसटी शेतात शिरून पलटी झाली. एसटीमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते.
कुर्डूवाडी डेपोची एसटी वैरागवरून स्वारगेटकडे जात असताना पिंपळनेरनजीक पलटी झाली. या अपघातात २४ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सोलापूरला आणले आहे. एसटी पलटी झाल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढून शेतात बसवण्यात आले, तर काही जखमींना कुर्डुवाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिंपळनेरनजीक एसटी चालकाला फीट आल्यामुळे त्याचा पाय एक्सलेटरवर दाबला गेला आणि त्यामुळे ही बस रस्ता सोडून कडेला गेली. चालकाला काही सुचण्याच्या आधीच ती थेट शेतात जाऊन उलटली.
या प्रकारामुळे एसटीतील प्रवासी चांगलेच भयभीत झाले होते; मात्र कोणालाही गंभीर इजा झाली नाही अथवा जीवितहानी झाली नाही.