नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर बसमध्ये चढतांना गर्दीत भामट्यांनी महिलेच्या पर्स मधील ४० हजाराची रोकड हातोहात लांबविल्याची घटना दिंडोरीनाका भागात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगिता विष्णू बोंबले (रा.पिंपळगाव केतकी ता.दिंडोरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बोंबले या गुरूवारी (दि.१८) कामानिमित्त शहरात आल्या होत्या. काम आटोपून दुपारी त्या परतीच्या प्रवासासाठी दिंडोरीनाका येथील बस थांब्यावर गेल्या असता ही घटना घडली. दिंडोरी येथे जाणा-या सीटी लिंक बस मध्ये चढत असतांना ही घटना घडली.
गर्दीत अज्ञात चोरट्यानी त्यांच्या पर्स मधील ४० हजाराची रोकड लांबविली असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत. दरम्यान ही बाब लक्षात येताच बोंबले यांनी आरडाओरड केल्याने बस पंचवटी पोलीस ठाण्यात नेण्यात आली मात्र तत्पूर्वी चोरटे पसार झाले होते. प्रवाश्यांच्या अंगझडतीत कुणाकडेही एवढी रक्कम आढळली नाही.