नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम यावेळी थेट नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात होणार आहे. यावेळी विधानसभा मतदारसंघनिहाय समस्या ऐकल्या जातील, हे विशेष.
प्रत्येक महिन्याला हा कार्यक्रम गडकरी यांच्या खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात होतो. मात्र, यावेळी दि. 4 ऑगस्ट 2024 रोजी गडकरी महापालिकेच्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहतील आणि सकाळी ११ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत मनपाशी संबंधित नागरिकांच्या समस्यांची विधानसभानिहाय सुनावणी करतील.
याप्रसंगी महापालिका आयुक्त, अन्य अधिकाऱ्यांसह इतर मान्यवरही गडकरी यांच्या समवेत उपस्थित असतील. नागरिकांनी आपल्या समस्या या जनसंपर्क कार्यक्रमामध्ये मांडण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
प्रशासकीय इमारतीत काऊंटर
जनसंपर्काला होणारी गर्दी लक्षात घेता, नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये तळमजल्यावर काउंटर लावले जाईल. या काउंटरवरून नागरिकांना टोकन नंबर दिले जातील. या टोकन नंबरनुसारच नागरिकांना श्री. गडकरी यांच्यापुढे समस्या मांडण्यासाठी पाठविले जाईल.
जनसंपर्क कार्यक्रमात येणाऱ्या समस्यांची नोंद घेऊन शक्य त्या प्रकरणात तातडीने कार्यवाहीची सूचना श्री. गडकरी देतील. जास्त कालावधी लागणाऱ्या प्रकरणात अर्जदारांना लेखी स्वरुपात सूचित केले जाईल. प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींबाबत कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात यावा, असे गडकरी यांनी महापालिका प्रशासनाला सूचविले आहे.
जनसंपर्काला येणाऱ्या नागरिकांनी स्वतःची निवेदने सुवाच्छ अक्षरात लिहून आवश्यक त्या कागदपत्रांसह आणावीत, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
विधानसभानिहाय सुनावणी
४ ऑगस्ट २०२४ रोजी महापालिकेच्या मुख्यालयात होत असलेल्या जनसंपर्क कार्यक्रमात सकाळी ११ ते दुपारी १२:४५ वाजेपर्यंत पूर्व, उत्तर आणि मध्य नागपूर या तीन विधानसभा मतदारसंघातील मनपाशी संबंधित समस्या श्री. गडकरी जाणून घेतील. दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत ते दक्षिण-पश्चिम, पश्चिम आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील समस्या जाणून घेतील.