नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) कोर्टात साक्ष दिली तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी देत सराईताने एका तरूणास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना खुटवड नगर भागात घडली. याप्रकरणी अबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज त्रिपुरा सिंग (२५ रा.कार्तिकनगर,खुटवडनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत प्रफुल्ल सुरेश शेळके (२१ रा.डीजीपीनगर माऊली लॉन्सजवळ कामटवाडे) या युवकाने फिर्याद दिली आहे.
शेळके मंगळवारी (दि.१६) रात्री खुटवडनगर भागात गेला होता. मयुर हॉस्पिटल समोर तो उभा असतांना ही घटना घडली. हॉस्पिटल परिसरातील अंधारात वाहन उभे करून आलेल्या संशयिताने शेळके यास शिवीगाळ व दमदाटी करीत माझ्या विरूध्द कोर्टात साक्ष दिली तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी देत त्यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. अधिक तपास पोलीस नाईक टिळेकर करीत आहेत.