इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ढाकाः सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी बांगला देशातील विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान राजधानी ढाकासह अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. एकाच दिवसात १८ जण ठार झाले, तर अडीच हजारांहून अधिक लोक जखमी झाले. आंदोलनाच्या सुरुवातीपासून मृत्यू झालेल्यांची संख्या २५ झाली आहे.
आंदोलकांनी ढाक्याच्या रामपुरा भागातील सरकारी बांगला देश टेलिव्हिजन इमारतीला घेराव घातला आणि त्याच्या पुढच्या भागाचे नुकसान केले. तसेच तेथे उभी असलेली अनेक वाहने पेटवून देण्यात आली. त्यामुळे पत्रकारांसह अनेक कर्मचारी तेथे अडकले. १९७१ मध्ये पाकिस्तानपासून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या युद्ध वीरांच्या नातेवाइकांसाठी काही नोकऱ्या राखून ठेवण्याच्या व्यवस्थेच्या विरोधात ढाका आणि इतर शहरांतील विद्यापीठातील विद्यार्थी अनेक दिवसांपासून मोर्चे काढत आहेत.
राजधानीच्या उत्तरेकडील भागात जेथे अनेक खासगी विद्यापीठे आहेत. तेथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक झाली. मृतांमध्ये बहुतांश विद्यार्थी होते. अधिकाऱ्यांनी ताबडतोब मृतांची ओळख जाहीर केली नाही; परंतु अहवालात असे म्हटले आहे, की मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापूर्वी मंगळवारी सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी, काल रात्री आणखी एका मृत्यूची नोंद झाली, एका आठवड्यापेक्षा जास्त काळापूर्वी निदर्शने सुरू झाल्यापासून मृत्यूची एकूण संख्या २५ झाली आहे. वाढत्या हिंसाचारामुळे, अधिकाऱ्यांना गुरुवारी दुपारपासून ढाका येथून जाणारी रेल्वे सेवा तसेच मेट्रो रेल्वे बंद करावी लागली. सरकारने आंदोलकांना रोखण्यासाठी इंटरनेट बंद करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती अधिकृत वृत्तसंस्थेने दिली आहे. यासोबतच राजधानीसह देशभरात निमलष्करी दल बॉर्डर गार्ड, बांगलादेशचे जवान तैनात करण्यात आले आहेत. अनेक दिवसांच्या निदर्शने आणि हिंसक चकमकींनंतर किमान सात लोकांचा मृत्यू झाला.