नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नियमीत घरी येणा-या नातेवाईकाने महिलेचे दागिणे चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत तब्बल सात लाख रूपये किमतीचे अलंकार भामट्याने पळविले असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रांत राजकुमार सिंग (रा.पंचशिलनगर,नाशिकरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित नातेवाईकाचे नाव आहे. याबाबत जोत्सना यशवंत बागुल (रा.रेणूका प्रसन्न अपा.काका हांडोरे चौक,विहीतगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
संशयित व फिर्यादी एकमेकांचे नातेवाईक असून ११ मे ते ३० जून दरम्यान भामट्याने ही चोरी केल्याचा आरोप महिलेने केला आहे. संशयिताने वेळोवेळी घरी येवून महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधत कपाटातील सुमारे ७ लाख ५ हजार रूपये किमतीचे अलंकार हातोहात लांबविले. अधिक तपास उपनिरीक्षक सपकाळे करीत आहेत.