इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शुक्रवारी मुंबईतून भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय जलपर्यटन जहाज ‘कोस्टा सेरेना’ क्रूझला हिरवा झेंडा दाखवून क्रूझच्या देशांतर्गत जलप्रवासाचा आरंभ केला.
“कोस्टा क्रूझच्या देशांतर्गत जलप्रवासाचा भारतातील आरंभ हा एक महत्त्वाचा प्रसंग असून जल पर्यटन आणि पर्यटनातील एका नवीन युगाची पहाट दर्शवतो.हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “देखो अपना देश” या उपक्रमाशी सुसंगत आहे.”,असे सर्बानंद सोनोवाल यांनी यावेळी सांगितले.
भारताने जलपर्यटन क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने मोठा आर्थिक सकारात्मक प्रभाव, रोजगार निर्मितीची क्षमता, परकीय चलन मिळवणे यासह इतर अनेक फायद्यांसाठी क्रूझ पर्यटनाला सक्रियपणे प्रोत्साहन दिले आहे. किनारी राज्य आणि बेटांच्या पर्यटन स्थळांवर जल पर्यटन स्थळे विकसित करणे यावर महत्त्वपूर्ण भर दिला जात आहे.
भारतातील क्रूझ पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी आणि नवसंजीवनी देण्यासाठी सरकारने घेतलेल्या अनेक उपक्रमांमुळे कोस्टा क्रूझच्या देशांतर्गत जलप्रवासाचा शुभारंभ शक्य झाला आहे. कोस्टा क्रूझ, इटली कार्निव्हल कॉर्पोरेशनचा एक भाग आहे, जो नामांकित क्रूझ ब्रँड्ससह जगातील सर्वात मोठ्या क्रूझिंग समूहांपैकी एक आहे. क्रूझ जहाजांना बर्थची हमी, सर्व प्रमुख बंदरांसाठी सवलतीचा एकसमान दर, देशांतर्गत क्रूझ जहाजांसाठी क्रुझ शुल्कामध्ये 30% पर्यंत सवलत, परदेशी क्रूझ जहाजांसाठी कॅबोटेज माफी , सीमाशुल्कसाठी एकसमान विशेष कार्यप्रणाली , इमिग्रेशन, सीआयएसएफ , बंदरे, प्रवासी सुविधा वाढवून क्रूझ टर्मिनल्सचे अद्यतनीकरण आणि आधुनिकीकरण इ. उपाययोजनांचा यात समावेश आहे.