नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाहनांच्या समोरच्या तावदानावर जाणूनबुजून फास्टॅग न चिकटवता राष्ट्रीय महामार्गांचा वापर करणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अशा वाहनांकडून दुप्पट शुल्क वसूल करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्या वाहनांच्या समोरच्या काचेच्या तावदानावर आतल्या बाजूने फास्टॅग चिकटवलेला नसेल अशा वाहनांनी टोल भरण्याच्या मार्गिकेत प्रवेश केल्यावर त्या वाहनाच्या वापरकर्त्याला टोलची दुप्पट रक्कम भरावी लागेल. वाहनाच्या समोरच्या काचेच्या तावदानावर जाणूनबुजून फास्टॅग न चिकटवलेल्या वाहनांमुळे टोल प्लाझाच्या ठिकाणी टोलशुल्क भरण्यास विनाकारण विलंब होतो आणि त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांचा वापर करणाऱ्या इतर वाहनांची गैरसोय होते.
सर्व वापरकर्ता शुल्क संकलन संस्था आणि सवलतदार संस्था यांच्यासाठी तपशीलवार प्रमाणित परिचालन पद्धत (एसओपी) जारी करण्यात आली असून त्यानुसार, वाहनाच्या समोरच्या काचेच्या तावदानावर फास्टॅग न चिकटवलेल्या वाहनांकडून दुप्पट वापरकर्ता शुल्क वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्याशिवाय, अशा फास्टॅग न चिकटवलेल्या वाहनांच्या बाबतीत टोल प्लाझाच्या ठिकाणी वाहन नोंदणी क्रमांकासह (व्हीआरएन) सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्ड देखील केले जाणार आहे. यामुळे वसूल केलेल्या शुल्कासंदर्भात तसेच अशा वाहनाच्या टोल मार्गाच्या उपस्थिती बाबतची व्यवस्थित नोंद ठेवली जाईल.
याआधीच्या काळात लागू केलेल्या नियमांना अनुसरून, संदर्भित वाहनाच्या बाबतीत समोरच्या काचेच्या तावदानावर आतल्या बाजूने फास्टॅग चिकटवण्यासंदर्भात प्रमाणित पद्धतीबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करवून घेणे हा एनएचएआय चा उद्देश आहे. संदर्भित वाहनाच्या समोरच्या काचेच्या तावदानावर न चिकटवलेला कोणताही फास्टॅग टोल प्लाझाच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक टोल संकलन (ईटीसी) व्यवहार करण्यास पात्र ठरत नाही. आणि म्हणून अशा वाहनाला नेहमीच्या शुल्काच्या दुप्पट टोल भरावा लागेल तसेच असे वाहन क्रमांक काळ्या यादीत देखील टाकले जाऊ शकतात. फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांना देखील निर्देश देण्यात आले आहेत की त्यांनी विविध विक्री केंद्रांतून (पीओएस) जारी केलेला प्रत्येक फास्टॅग विविक्षित वाहनाच्या समोरील काचेच्या तावदानावर व्यवस्थित चिकटवलेला आहे याची खात्री फास्टॅग जारी करतानाच करुन घ्यावी.
राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर आणि संकलन यांचे निश्चितीकरण) नियम, 2008 नुसार एनएचएआय राष्ट्रीय महामार्गांवर वापरकर्ता शुल्क संकलित करत असते. सध्या देशातील 45,000 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय तसेच द्रुतगती महामार्गांसाठी राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या वरील सुमारे 1,000 टोल प्लाझांच्या माध्यमातून वापरकर्ता शुल्क संकलित केले जाते.
सुमारे 98 टक्क्याच्या पेनिट्रेशन दरासह आणि 8 कोटींहून अधिक वापरकर्त्यांसह, फास्टॅगने देशातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन यंत्रणेत क्रांती घडवून आणली आहे.फास्टॅग न चिकटवलेल्या वाहनांच्या बाबतीत दुप्पट शुल्क वसुलीच्या या उपक्रमामुळे टोल संकलन प्रक्रिया अधिक परिणामकारक होईल आणि राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्यांसाठी अधिक सुलभ तसेच आरामदायक प्रवासाची खात्री देता येईल.