नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या उंबरधे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने झुंबा डान्सचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षक भारत पाटील यांनी त्यासाठी झुंबा डान्स शाळेत सुरु केला आहे. या झुंबा डान्सला त्यांनी अहिराणी व खान्देशी लोकगीतांची जोड दिली आहे. त्या गीताच्या तालावर विद्यार्थी उत्साहात वर्कआऊट करत आहेत.
या उपक्रमाबाबत भारत पाटील यांनी सांगितले की, पाय, गुडघे, कंबर, हात, खांदे, मान यांच्या योग्य हालचाली घेऊन तालबद्ध व्यायाम कवायतीमध्ये होतो. त्याला संगीताची जोड देऊन त्या तालावर हे वर्कआऊट केले जाते. त्यामुळे स्नायू बळकट होतात. मानसिक स्वास्थ तंदुरूस्त राहण्यासह रक्तदाब सुधारतो. कॅलरीज बर्न करता येतात. या प्रकारे अनेक फायदे झुंबा डान्सचे आहेत.