इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काठमांडूः भूकंप काही नेपाळची पाठ सोडायला तयार नाही. गेल्या महिन्यात वारंवार धक्के बसल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाने हाहाकार माजवला. गेल्या महिन्यात अफगाणिस्तानमधथ्ये भूकंपाने हजारो नागरिकांचा बळी घेतला, तर आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार, नेपाळमध्ये १२९ जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमध्ये ६.४ रिश्टर स्केलचा भूंकपाचा धक्का बसला. ढिगाऱ्याखाली शेकडो लोक दबले गेले आहेत. नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भूकंप केंद्र होता. जाजरकोट भूकंप मध्ये ९२ लोकांचा मृत्यू झाला तर ५५ जण जखमी झाले. रुकुम वेस्टमध्ये ३६ लोकांचा मृत्यू झाला तर ८५ लोख जखमी झाले आहे. हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.
दिल्ली,एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. बिहारमधील पाटण्यापासून मध्य प्रदेशातील भोपाळपर्यंत भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा प्रभाव उत्तर प्रदेशातील लखनऊमध्येही दिसून आला. नेपाळमध्ये भूकंपानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून किती लोक जखमी झाले, हे अजून कळायला मार्ग नाही. जखमींना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुकूम आणि जाजरकोटमध्ये भूकंपामुळे अधिक बळी गेले आहेत. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मापन केंद्रावर झालेल्या नोंदीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात होता. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी बचाव आणि मदतीसाठी तीन सुरक्षा एजन्सी तैनात केल्या आहेत. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरुन घराबाहेर पडले.
गेल्या काही महिन्यांत नेपाळ बऱ्याचदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरूने गेला. दहा दिवसांत आता दुसऱ्यांदा भूकंप झाला. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड आणि हरियाणासह देशातील अनेक भागांत भूकंपाचे जोरदार धक्के बसले. अचानक आलेल्या या भूकंपामुळे लोक घराबाहेर पडले. रात्री ११.३२ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.