नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक लाख 98 हजार 899 महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यासाठी 5 हजार 797 मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे यांनी ही माहिती दिली.
ग्रामपंचायती, अंगणवाडी केंद्रे, समूह संघटक, सेतू सुविधा केंद्रे या एकत्रित माध्यमातून 5 हजार 115 मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून एक लाख 30 हजार 723 अर्ज प्राप्त झाले आहेत. नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात 98 मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून 29 हजार 69 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर अंगणवाडी शहरी प्रकल्पांतर्गत 584 मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून 39 हजार 107 अर्ज प्राप्त झाले आहेत. वैयक्तिक व शासकीय यंत्रणा बाहेरील व्यक्ती व्यतिरिक्त ही संख्या आहे. प्राप्त अर्जांची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय यंत्रणा मेहनत घेताना दिसून येत असून, या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक लाभातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. नोंदणी बाकी असलेल्या महिलांनी जवळची अंगणवाडी केंद्रे, ग्रामपंचायत कार्यालये, वार्ड कार्यालये, सेतू सुविधा केंद्रे, आपले सरकार सेवा केंद्र येथील मदत केंद्रांशी संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनातर्फे श्री. दुसाणे यांनी आवाहन केले आहे,