नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), कळवणचा नाशिक विभागातील उत्कृष्ट आयटीआय म्हणून गौरव करण्यात आला. आदिवासी भागात तांत्रिक शिक्षणाची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल एल्फिस्टन हायस्कुल, मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. नाशिक विभागातील उत्कृष्ट आयटीआय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रुपये एक लाख रकमेचा धनादेश व मानचिन्ह देण्यात आले. संस्थेचे प्राचार्य सतिष भामरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.
कार्यशाळेतील यंत्रसामुग्रीची मांडणी, रचना, हरित परिसर, प्रशिक्षणार्थींसाठी सुसज्ज प्रात्यक्षिक लॅब, व्हर्च्युअल क्लासरुम, ग्रंथालय, अभ्यासिका यासारख्या सुविधा आदि मानके उत्कृष्ट आयटीआय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देताना तपासण्यात आली. याबरोबरच संस्थेने आदिवासी प्रशिक्षणार्थींना परिसरातील विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग तसेच उत्तीर्ण झाल्यानंतर शिकाऊ उमेदवारीच्या संधी उपलब्ध करुन देऊन रोजगार स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी सक्षम केले.
त्याअनुषंगाने केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकार राज्यमंत्री रामदास आठवले, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, कुलगुरु अपुर्वा पालकर, सचिव गणेश पाटील, संचालक दिगंबर दळवी यांच्या हस्ते नाशिक विभागातील उत्कृष्ट आयटीआय म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक संस्थेचे प्राचार्य सतिष भामरे, गटनिदेशक राहुल विभांडीक यांनी स्वीकारले. यावेळी शिल्पनिदेशक संदीप चव्हाण, वरिष्ठ लिपिक विद्या पोतदार उपस्थित होते. या पुरस्कारासाठी संस्थेतील निदेशक, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.