इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः ‘ऑर्गनायझर’ पाठोपाठ आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असणाऱ्या विवेक साप्ताहिकाने अजित पवारांमुळे फटका बसल्याचे म्हटल्यामुळे त्यावर राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केल्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला असे विवेकच्या लेखात म्हटले आहे.
या लेखात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणे भाजपच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही. याची जाणीव भाजप नेत्यांना नाही असे नाही असे म्हटले आहे. शिवसेनेने पुन्हा युतीत येणे, त्यासाठी शिवसेनेत घडलेले अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना भाजप कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या. हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्याने आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने बारीकसारीक कुरबुरी असल्या, तरी ही युती नैसर्गिक असल्याचे मतदारांना पटले होते; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यानंतर ही भावना अगदी दुसऱ्या टोकाला गेली. लोकसभेच्या निवडणुकीमुळे या नाराजीत आणखी भर पडली, असे ‘विवेक’च्या लेखात म्हटले आहे.
राजकीय नेत्यांची वा पक्षाची स्वतःची काही गणिते व आडाखे असली, तरी निवडणुकीच्या राजकारणाचे आकलन वेगळे असते; परंतु ही गणिते चुकली, तरी त्याचे काय करायचे, हा प्रश्न उपस्थित होतो. कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण दिसत असले, तरी तेवढेच एक मुख्य कारण आहे असे मुळीच नाही. ते केवळ हिमनगाचे टोक आहे, असेही विवेकच्या लेखात म्हटले आहे.
पक्षाच्या मूळ कार्यकर्त्याला स्थान काय आणि पक्षामध्ये बाहेरून आलेल्यांना स्थान काय, याचा साकल्याने विचार करण्याचा सल्ला या मुखपत्रात देण्यात आला आहे. याचा अर्थ बाहेरून आलेला प्रत्येक जण चुकीचा आहे असा निश्चितच नाही. कित्येक नेते आज संघटनेसाठी, विचारधारेसाठी प्रभावीपणे काम करत आहेत. पक्षफोडीचा भाजपवर आरोप करणाऱ्यांनी स्वतः महाराष्ट्रात अख्खे पक्ष फोडाफोडी करून उभारलेले आपण पाहिलेले आहेत,अशी टीकाही लेखात विरोधकांवर केली.
या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आणीबाणीविरोधी संघर्ष आणि राम मंदिर आंदोलनात दिलेल्या योगदानाचे ‘नॅरेटीव्ह’ तरुण मतदारांच्या पचनी पडेल का, असा सवाल या लेखात उपस्थित करण्यात आला आहे. समाजातील सुशिक्षित वर्गापुढे काय नॅरेटिव्ह मांडतो आहोत, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ आणीबाणीच्या काळातील संघर्ष वा रामजन्मभूमीसाठी कार्यकर्त्यांनी केलेला त्याग, सांडलेले रक्त याबाबत त्याला आदर जरूर आहे. राम मंदिर निर्माण झाल्याचा त्याला निस्सीम आनंदही जरूर आहे; परंतु हे मुद्दे मतदान करताना ४०-४५ आतील सुशिक्षित मतदात्यांसाठी किती प्रभावी ठरतील, असा सवाल या लेखात करण्यात आला आहे.हिंदुत्ववादी मतदार असला तरी तरुण कार्यकर्ता म्हणून काम करताना ३०-४० वर्षांपूर्वीचे संदर्भ त्याला भावणारे नाहीत, असे मत ‘विवेक’च्या लेखात मांडले आहे.