नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील मोबाईल गल्ली म्हणून ओळखल्या जाणा-या महात्मा गांधी रोडवर अॅपल कंपनीच्या वतीने छापे टाकण्यात आले. या छाप्यात अॅपल कंपनीच्या बनावट यूएसबी केबल आणि मोबाईलची बॅक कव्हरची राजरोसपणे विक्री सुरू असल्याचे पुढे आले असून या कारवाईत साडे तीन लाख रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा विक्रेत्यांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वरूपसिंग कोजराजसिंग चव्हाण,हितेश उर्फ हनी किशनचंद रोहिडा,अशोक कुमार बेराराम बिष्णोई, गोविंद हरिराम बिष्णोई, महेंद्रसिंग भेरसिंग चव्हाण व धनराज मंकाराम चौधरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित विक्रेत्यांची नावे आहेत. याबाबत अॅपल कंपनीचे कुंदन बेलोसे (रा.विठ्ठलवाडी,कल्याण) यांनी फिर्याद दिली आहे. नाशिक येथील एमजीरोड भागात असलेल्या मोबाईल मार्केट मध्ये अॅपल कंपनीच्या बनावट मालाची राजरोसपणे विक्री सुरू असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती.
त्यानुसार सोमवारी (दि.१५) पथकाने धाव घेत ही छापेमारी केली. या कारवाईत संशयितांच्या दुकानामध्ये हुबेहुब दिसणारे लाखो रूपये किमतीचे बनावट युएसबी केबल आणि मोबाईलचे बॅक कव्हर आढळून आले. सहा दुकानांमधुन सुमारे ३ लाख ५२ हजार ७०० रूपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक नरूटे करीत आहेत.