इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंढरपूरःलाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार, पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांना आठ हजार आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये आले होते. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
‘लाडका भाऊ’ योजनेंतर्गत बारावी उत्तीर्ण तरुणांना दर महिन्याला सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये दिले जाणार आहेत. हे तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करतील. तिथे त्यांना कामाचा अनुभव मिळेल. अनुभवाच्या जोरावर त्यांना नोकऱ्या मिळतील. या योजनेच्या माध्यमातून कुशल कामगार तयार करत असल्याचे सांगून शिंदे म्हणाले, की राज्यासह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. त्याचे पैसे सरकार भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणली असून, त्यातून बेरोजगारीवर तोडगा निघणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.