नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- द्वारका ते पखालरोड भागात धारदार चाकूचा धाक दाखवून तिघांनी रिक्षाचालकास लुटल्याची घटना घडली. याघटनेत दोन हजाराच्या रोकडसह मोबाईल बळजबरीने काढून घेत भामट्यांनी पोबारा केला असून त्यातील एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गेश सोमनाथ मुळे (२० रा.निलगिरीबाग,म्हाडा वसाहत) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत कलीमुद्दीन शाबिर शेख (रा.जुना कथडा,अमरधामरोड) या रिक्षाचालकाने फिर्याद दिली आहे. शेख गेल्या गुरूवारी (दि.११) मध्यरात्री पखालरोड भागात प्रवाश्यांना सोडण्यासाठी गेले असता ही घटना घडली होती. द्वारका येथून एमएच १५ एफयू ९३९३ या अॅटोरिक्षात ते प्रवासी बसवून पखालरोड वरिल चकदे क्रिकेट टर्ब भागात गेले होते.
प्रवासी उतरवून ते रस्त्यावर रिक्षाजवळ उभे असतांना अज्ञात तिघा तरूणांनी त्यांना गाठले. यावेळी दोघांनी हात पकडून ठेवत तिसºयाने धारदार चाकूचा धाक दाखवत खिशातील दोन हजाराची रोकड व मोबाईल बळजबरीने काढून घेत त्रिकुटाने पोबारा केला होता. याबाबत तक्रार प्राप्त होताच पोलीसांनी एका संशयिताच्या मुसक्या आवळ्ल्या असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. अधिक तपास जमादार सोनार करीत आहेत.